महाविकास आघाडीव्हावी ही काँग्रेसचीही इच्छा

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत महविकास आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरु केल्यानंतर महविकास आघाडी व्हावी अशी इच्छा काँग्रेसचे शहराध्यक्ष जयप्रकाश घोलप यांनी व्यक्त केली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर काँग्रेसनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्वच प्रभागात उमेदवारीसाठी काँग्रेसची चाचपणी सुरु असल्याचे त्यांनी काँग्रेस शहर कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी कामगार नेते लक्ष्मण कुडव, काँग्रेस सेवादलाचे जिल्हा मुख्य संघटक विजयन नायर, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष सुषमा पाटील आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीत कुणाच्या वाट्याला किती जागा येतील वा कोणाला कोणत्या जागा मिळतील हे नंतर ठरवता येईल. मात्र महाविकास आघाडी होणार कि नाही हे आधी ठरले पाहिजे. त्यासंदर्भात चर्चेसाठी काँग्रेसकडून लवकरच प्रस्ताव देण्यात येणार असल्याचेही घोलप यांनी स्पष्ट केले.