भाजपाच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी किसन कथोरे यांची निय

___ बदलापूर: भारतीय जनता पक्ष ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला रोखण्यासाठी आमदार किसन कथोरे यांची नियुक्ती केली गेल्याचे बोलले जात आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाने आपले स्थान निर्माण केले आहे. यात आमदार किसन कथोरे यांचा सिंहाचा वाटा आहे. किसन कथोरे यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. तसेच सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक मतांची आघाडी घेऊन निवडून आलेले आमदार म्हणून किसन कथोरे राज्यात परिचित आहेत. त्यांनी नुकताच भाजपतर्फे विधानसभेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी देखील अर्ज दाखल केला होता. ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या १८ तर लोकसभेच्या ३ जागा असल्याने आमदार किसन कथोरे यांना भारतीय जनता पक्षाने ठाणे जिल्हाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एक तगडे आव्हान दिले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोडीने काम करणारा नेता म्हणून देखील किसन कथोरे यांच्याकडे पाहिले जाते. आमदार किसन कथोरे यांना नवी जबाबदारी दिल्यानंतर येणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर च्या नगरपालिकेच्या निवडणुका आणि त्यानंतर येणाऱ्या मुरबाड नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.