कर्जमुक्ती २४ फेब्रुवारीपासून

 


राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेनुसार पहिल्या टप्प्यात २८ लाख ५० हजार शेतकरी कर्जमुक्त होणार असून त्यादृष्टीने सरकारने तयारी केली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्यक्ष कर्जाची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, शुक्रवारी कर्जमाफी योजनेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.भाजप-शिवसेना युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना सुरू केली होती. मात्र त्या योजनेबाबत सत्तेत असूनही शिवसेना समाधानी नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी नव्याने महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. पात्र शेतकऱ्याला विनासायास कर्जमाफी मिळाली पाहिजे, यासाठी खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत.